dropdown

slideshow

...

paryatan

यशवंत तलाव
             तोरणमाळच्या रुंद छातीवर करुणा, स्नेह आणि वरदानाचे त्रेविनी संगम असलेले हे विस्तीर्ण सरोवर सातपुड्याच्या टेकड्यांमध्ये दक्षिणोत्तर तयार झालेले आहे. महाराष्टाचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ या तलावाला यशवंत तलाव असे नाव देण्यात आले आहे. हा तलाव म्हणजे तोरणमाळच्या सौंदर्याचा दागिना. या तलावाबाबत पौराणिक संदर्भही दिला जातो. गोरक्षनाथांनी येथे तपशर्या केल्याचे सांगितले जाते. या तळ्याच्या खोलीबाबत येथील आदिवाशीमध्ये विविध कथा रूढ आहेत वनविभागाच्या माहितीनुसार या तलावाची खोली ९.२० मीटर आहे. येथील पाण्याची क्षमता साडेतीन हजार टी. एम. सी. आहे. या तलावातील पाणी पाझरत नाही. त्याचा परिघ चार किलोमीटर अंतराचा असुन हा रस्ता प्रदक्षिणेसाठी तयार करण्यात आला आहे. अनेक पर्यटक तळ्याभोवती प्रदक्षिणा घालून निसर्गाचा आनंद लुटतात. या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था आहे.

सिताखाई
              तोरणमाळच्या माथ्यावरील ईशान्य कोपऱ्यात एक खोल दरी आहे. या दरीची खोली सुमारे एक हजार फुटापेक्षा अधिक आहे. त्याला सिताखाई असे म्हणतात..यशवंत तलावातून ओव्हर फ्लो झालेले पाणी एका नाल्यातून सिताखाईत येते.पावसाळ्यात हे पाणी अधिक प्रमाणाततयार असते.त्यामुळे तेथे मोठा व भव्य धबधबा तयार होतो. या ठिकाणी आवाज दिल्यास येथे तीन वेळा त्याचा प्रतिध्वनी ऐकू येतो.पर्यटकांसाठी हे अधिकच आकर्षण आहे .
खडकी पॉईंट
            तोरणमाळ हिल रिसोर्टपासून तीन किलोमीटर अंतरावर खडकी पॉईंट आहे या स्थळापर्यंत डांबरी रस्ता झालेला आहे. या पॉईंट वरून सातपुडा चे सौंदर्य निहाळता येते. येथून खाली डोंगर दऱ्यात वसलेले खडकी, झापी,कुंड्या इ. गावातील चंद्रमोडी झोपड्यांचे दर्शन होते. पावसाळ्यात या पॉईंटवरून सातपुड्यातील दृश्य पाहणे हे खरोखरच डोळ्याचे पारणे फेडणारे असते.
मत्स्येंद्रनाथांची गुफा
            यशवंत तलावापासून दक्षिणेला दीड किलोमीटर अंतरावर मत्स्येंद्रनाथांची गुफा आहे.डोंगरातच ही गुफाकोरली गेली आहे .या ठिकाणी मत्स्येंद्रनाथांची  तपश्रर्या केल्याचे सांगितले जाते.पर्यटन आणि भाविकांसाठी हे एक आकर्षक स्थळ आहे.
सनराईज व सनसेट पॉईंट    
            तोरणमाळ हिल रिसोर्टपासून सदरणत: एक किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर सनराईज पॉईंट आहे.या ठिकाणाहून सूर्योदय  पाहणे म्हणजे आयुष्यातील तो एक विलक्षण क्षण.इतर भागापेक्षा साधारणत: २० ते २५ मिनिटे पूर्वी येथून सूर्योदय पहाता येतो.त्याचा पुढेच अर्धा किलोमीटर अंतरावर सनसेट पॉईंट आहे.येथून सुर्यास्त पाहण्याचा आनंद काही वेगळाच .सपाटीवरच्या भागात सुर्यास्त झाल्यानंतर किमान १५ मिनिटे उशिरा येथे सुर्यास्त  होतो .ही दोन्ही ठिकाणे निसर्ग सौंदर्याने बहरलेली आहेत .त्यामुळे पर्यटकांना येथे वेळ कसा निघून जातो ते कळत नाही .
आमदरी पॉईंट
            तोरणमाळ हिल रिसोर्टपासून साधारणत: दोन किलोमीटर अंतरावर आमदरी पॉईंट
 हे निसर्ग रम्य स्थळ आहे .या ठिकाणाहून खोल दरीत विस्तारलेले आमदरी पाड्याचे दर्शन होते .सातपुड्याचा नैसर्गिक सौंदर्य पाहण्याचा आनंद येथेही लुटता येतो .
सातपायरी पॉईंट
            तोरणमाळला जाताना काळापाणीपासून सातपायरी घाट सुरु होतो .हा घाट चढल्यानंतर येथे सातपायरी पॉईंट आहे .या ठिकाणाहून खाली घाटात पाहिल्यास वळणा वळणाने आलेला रस्ता जणू  सातपायरी असल्याचा भास होतो . अतिशय विहंगम दृश्य येथून पहाता येते. पर्यटकांसाठी हे सर्वात आकर्षण असलेले स्थळ . पावसाळ्यात येथून सातपुडा न्याहाळता येण्याचा आनंद काही औरच असतो.
नागार्जुन गुफा
            सात पायरी चडल्यानंतर सातपायरी पॉईंटच्या खाली साधारणतः ५० मीटर अंतरावर नागार्जुनची गुफा आहे. बौद्ध आचार्य नागार्जुन हे एक महान आचार्य होते. त्यांचे शिष्य यान्ही अजिंठा वेरूळ सारखे या ठिकाणी ही लेण्या कोरण्याचा प्रयत्न केला होता पण येथील खडक तेवढा मजबूत नसल्यामुळे हे अपुर्ण अवस्थेत राहिले आहे.
तसेच या गुहेत स्वतंत्र तीन मूर्ती असुन मधोमध वृषभ नाथाची मूर्ती आहे. वृषभ नाथ कार्योत्सर्ग  आसनात उभे असुन त्यांच्या दोन्ही बाजूस लहान जीनांच्या मूर्ती आहेत. अंकाई – टंकाई [ जि. नाशिक ] किल्याजवळील जैन गुहेत अशाच जिना मूर्ती आढळतात. या मूर्ती साधारणत: अकराव्या शतकातील असाव्यात असा अंदाज आहे. अतिशय आकर्षक शिल्प असलेल्या या मूर्ती पर्यटकांना आकर्षित करतात.
जालंधरनाथ
            सातपायरी घाटाचे दृश्य पाहिल्यानंतर पुढे घेल्यावर उजव्या हाताला एक रस्ता लागतो. या रस्त्याने साधारणत: सात किलोमीटर अंतरावर  जालंधरनाथाचे भग्न अवशेषातील मंदिर आहे .या मंदिराजवळ तोरणमाळ किल्ल्लाचे तट आजही सुस्थितीत दिसून येतात.तोरणमाळच्या तटाची रुंदी किती भव्य असेल याची प्रचिती येथे येते .याशिवाय तट बांधण्यासाठी वापरण्यात आलेले दगड,विटा,बांधकामाचे तंत्र यावर अभ्यासकांना अभ्यासही येथे करता येऊ शकतो .या ठिकाणी सातापुड्याचे सौंदर्य पाहण्याचा आनंदही पर्यटकांना मिळतो.
जंगल भ्रमंती
             जंगल भ्रमंती करणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी येथे दोन टॅूकींग मार्ग तयार करण्यात आले आहेत .पहिला मार्ग लेगापानी फाटा ते काळापाणी.हा एकेरी चार किलोमीटर रस्ता आहे.या रस्तावर पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो. पक्षी निरीक्षण , वाघांची गुफा , पावसाळ्यात धबधबे, औषधी वनस्पतीचा अभ्यास करता येतो. दुसरा मार्ग कालापाणी ते सातपायरी घाट या घाटातील उंचीचे ठिकाण असा अडीच किलोमीटरचा एकेरी मार्ग आहे.
पर्यटकांना भेटी देण्याची योग्य वेळ
            तोरणमाळ ला बाराही महिने पर्यटकांचा ओघ असतो. निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी जुलै ते जानेवारी पर्यंतचा काळ पर्यटकांच्या पसंतीचा आहे. तसेच महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचेथंड हवेचे ठिकाण असल्याने अनेक पर्यटक फेब्रुवारी ते जून या काळात येथील आल्हाददायी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येतात.
पर्यटकांसाठी आकर्षण

            तोरणमाळ हे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण असल्याने येथे वनविभागाच्या पुढाकाराने पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटता यावा यासाठी विविध स्थळांचा विकास करण्यात आला आहे. निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पर्यटकांना डोळ्यात साठविता यावे यासाठी कालापाणी , खडकी पॉईंट , आमदरी पॉईंट , बिलदरी पॉईंट , सिता खाई , यशवंत तलाव या ठिकाणी पॅगोडे बांधण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी निसर्ग निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत.